Monday 29 July 2019

"श्रावणाचे स्वागत...पारिजातक सोबत"...

  "श्रावणाचे स्वागत...पारिजातक सोबत"...

      " वसंत ऋतुत फुललेला पळस... तर वर्षा ऋतुत बहरलेला पारिजातक "...
   वसंतारंभी बहरलेला पळस सर्वांचे लक्ष वेधुन ज्याप्रमाणे वसंतोत्सवाला सुरूवात करतो...हुबेहुब त्यातच अनुकरण करत पारिजातकाची फुले आरंभ करतात ती श्रावणोत्सवाला!दोन्ही ऋतुच्या अन् फुलांच्या पहिल्या अक्षरात जरी साम्य आढळत असल तरी दोहोंमध्ये खुप विरोधाभास आहे...
     वसंतात रखरखत्या उन्हात निरभ्र निळ्या आकाशी केशरी रंगाची पळसाची फुले जशी "डोळ्यांना आकर्षित" करतात अगदी त्याच्या विरूद्ध वर्षा ऋतुत राञीच्या काळ्याभोर अंधारात, सोबतीला गुणगुणणारी रातकिडे तर कधी आकाशी असलेली ढगांची वर्दळ त्यात मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट कधीकधी तर अंगाला झोंबणारा गारवा, रिमझीम पाऊस अन् ओल्या मातीचा सुवास अशा श्रावणात अंगणातील पडलेली पारिजातकाची पांढरी शुभ्र सोज्वळ फुले "मनाला मोहीत" करतात...
     भरदिवसा फुलणारी पळसाची फुले अन् अंधाऱ्या राञी बहरलेला प्राजक्त!...एवढा विरोधाभास असून दोन्ही फुलांमध्ये अजुन समानता आहे... तुम्ही विचारात पडला असेल मि विरोधाभास दर्शवण्याचा प्रयत्न करीत आहे की साम्य दर्शवण्याचा! मुळात मला दर्शवायच आहे निसर्गाचं निसर्गाशी असलेल नातं!
     तर दोन्ही फुलांमध्ये समानता कोणती तर तुम्ही म्हणाल दोन्ही फुलांमध्ये असलेली 'औषधी गुणधर्म'...निश्चितच आहेत! पण अजुन दोन्ही फुलांमधील साम्य म्हणजे दोन्ही फुले निगडीत आहेत ती "भगवान श्रीकृष्णाशी"... एक सहभाग घेतो 'जन्माष्ठमी उत्सवात' तर दुसर फुल 'रंगोत्सवात' स्वत:ला भागी करून घेत ं...आगळीकतेची गोष्ट म्हणजे वसंत ऋतुत बहरलेली पळसाची फुले सुरूवात करून देतात ती चैञ महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्याला (नविन वर्षाला)...तर श्रावणात सडा शिंपणाऱ्या पारिजातकाची फुले सण, उत्सव, व्रतांना आरंभ करतात... श्रावण मासात अन् इतरही कधी पाऊस पडला तर कधी न आठवणाऱ्या पण बालपणापासुन बाबांकडुन खुपदा ऐकलेल्या ओळी अलगद ओठांवर आल्यावाचुन राहत नाहीत...
   " श्रावणमासी हर्ष मानसी, 
       हिरवळ दाटे चोहीकडे...
       क्षणात येते सरसर शिरवे,
       क्षणात फिरूनी ऊन पडे"...
    लहानपणापासुन बालवयात झालेले संस्कार, शिस्त, बोलणं,वागणं आपण कधीही विसरू शकत नाही, अगदी त्याप्रमाणे 'निसर्ग'आपल्याला नकळतपणे खुप काही शिकवुन जातो! ज्याप्रमाणे अंधाऱ्या काळोख्या राञी चांदण्यांच्या शुभ्र प्रकाशात पारिजातकाची कोमल, नाजुकशी, टपोरी फुले आपल्या फुलांचा सडा अंगणभर पसरवुन त्या राञी प्रकाशाचा एक किरण,जणुकाही वरती आभाळात असलेली चांदणे या जमिनीवर खाली पारिजातकाच्या फुलांच्या रुपात येऊन आपला दरवळ सगळीकडे पसरवुन मनाला एका अनोख्या तेजाकडे घेऊन जातो अन् पहाटे उठल्या उठल्या तो फुलांचा सडा पाहुन जगण्याची नवी प्रेरणा मिळते...
    तर निसर्गाच्या स्वागताकरिता सज्ज असलेल्या श्रावणातील पारिजातकाच्या फुलांरूपी आपणही निसर्गाचे अन् येणाऱ्या श्रावणाचे स्वागत करून नवा आरंभ करून जगण्याला एक नवी दिशा देऊ...
      माझ्या या लिखाणाला सर्वस्वी जबाबदार असलेल्या निसर्गाचे मनस्वी आभार! कधी कधी काही आठवणी मनात घर करून राहतात त्यांनाच या लिखाणाद्वारे स्वतंञ वाट मोकळी करून दिलीयं...