Monday 9 March 2020

वसंतारंभी रंगोत्सवी पळस

        "वसंतारंभी रंगोत्सवी पळस"

"वसंतारंभी रंगोत्सवी पळस"...
         निसर्गाची पण अद्भुत किमया आहे...नाहीे?सगळीच फुलझाडं अन् फळझाडं सृष्टीच्या निर्मात्याने अगदी साजेशा स्वरूपात योग्य त्या वेळी अन् योग्य त्या ऋतुत तंतोतंत निर्माण केलेली आहेत...ज्या ज्या ऋतुमध्ये जे सण,उत्सव येतात त्या त्या सणांना,उत्सवांना योग्य ती फुलझाडे पुरक अशा पद्धतीने उपयोगी पडत असतात...कोणत्याच ऋतुत न आढळणारी माञ वसंतारंभी रखरखत्या उन्हात बहरलेली पळसाची फुलझाडे रस्त्याच्या कडेला  जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना अगदी मोहीत करतात...न राहवुन त्यांच्याकडे डोळे आकर्षित होतातचं...उन्हाळ्यात निरभ्र निळ्या आकाशी सुर्यनारायण आपल्या पिवळ्या, केशरी रंगांनी जणु धरतीवर आग ओकत असतो, पण जमिनीवर माञ ह्याच रंगांची फुले डोळ्याला सुखवुन जातात ...जणुकाही उन्हाळ्यात आकाशात अन् धरतीवरती उष्णरंगसंगती जुळवुन आणल्या जाते...
     या पळसाच्या फुलांचा अन् माझ्या बालपणींच्या आठवणींचा घनिष्ट संबंध..पळसाची फुले पाहिली की बालपणींच्या आठवणींची एक लहर हळुवारपणे मनाला स्पर्शुन जाते...माझ्या शेतात बालपणापासुन पळसाच झाड आहे...होळी सण जसजसा जवळ यायचा तसंतसं ते झाड जणुकाही मला शेताकडे खुणावत असायच...त्याला कारणही तसच होतं..दरवर्षी रंगपंचमीला माझे बाबा मला त्या झाडाची फुले वेचायला शेतात घेऊन जायचे...वसंत ऋतुला सुरूवात झालेली असायची बारमाही परिक्षा तोंडावर येऊन ठेपलेल्या असायच्या.अभ्यासाबरोबर सण,उत्सव आनंदात साजरे होत असत...त्यात धुलीवंदन,रंगपंचमी म्हणजे लहान मुलांची मौजमजा...मला माञ एकाच गोष्टीची उत्सुकता असायची...ती म्हणजे भगव्या रंगांच्या फुलांची...पक्ष्यांच्या आकाराची ती फुले वेचताना मन अगदी हरखुण जायचं..होळीच्या सणांमध्ये रंगपंचमीला रंग तयार करायचा तो याच फुलांचा, त्यासाठीच ही सर्व धडपड..पिशवी भरून फुले वेचताना बाबाही मदतीला असायचे..घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी ती सर्व फुले एका पातेल्यात उकळायला ठेवली जायची.. अंघोळीच्या वेळी त्या फुलांचा गडद केशरी रंग डोळ्यात साठवुन ठेवावासा वाटत असे..तेव्हा काहीच कळत नसे पण नंतर कळल की नैसर्गिक फुलांच्या रंगाने त्वचेला माञ काहीच नुकसान होत नसे.रंगपंचमीच्या दिवशी त्याच फुलांचा केशरी रंग पिचकारीमध्ये भरून खेळायचा..अशाप्रकारे धुलिवंदनाचा आनंद लुटला जात असे...ही आठवण लिहीण्यामागे एकच कारण यावर्षी परदेशात "कोरोना" विषाणुची लागण पसरलेली असताना भारतातही या विषाणुबद्दल भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे..चीन अन् इतर देशातुन आयात केले जाणारे रंगपदार्थ अन् पिचकारी यावर भर न देता स्वदेशी सामान वापरण्यावर भर देण्यात येत आहे..निसर्गमयी,पर्यावरणपुरक रंग वापरण्यावर भर दिली तर  निसर्गाला पुरक  औषधी गुणधर्म असलेली पळसाची फुलं रस्त्याच्या कडेला पहायला मिळत आहेत या फुलांचा योग्य  उपयोग करून आपण ही होळी निसर्गमयी साजरी  करण्याचं आगळवेगळ समाधान मिळेल...
सर्वांना होळीच्या अन् रंगोत्सवाच्या शुभकामना!🍂🍁
     

Thursday 14 November 2019

"मोगरा जगला"...बालकदिन विशेष!

                  "मोगरा जगला"...

      मोगरा फुलला अस बऱ्याच जणांनी ऐकलेलं किंवा वाचलेलं असेल.पण मोगरा जगला हे ऐकुन थोडस विचिञच वाटेल..अन् आपसुकच मोगरा जगला म्हणजे नेमका कसा? ही काय भानगड आहे? हा प्रश्न उपस्थित होईल...आज *बालकदिन* त्यामुळे माझ्या बालपणी मी अनुभवलेल्या गोष्टी अन् निसर्ग याची सांगड घातली आहे..."मोगरा जगला"...कसा जगला?खरं तर त्यामागची कथा अन् कहाणी पण तशीच रोचक अन रोमांचक आहे...
       मि लहान असताना माझ्या घरासमोर ऐसपैस अंगण अन् अंगणासमोर गोठा असायचा...आताही डोळे बंद केले अन भुतकाळात अलगद प्रवेश केला तर अख्खच्या अख्ख अंगण अगदी हुबेहुब जसच्या तस डोळ्यासमोर येतं...अंगणात बरीचशी फुलझाडे अन् एखाद दोन फळझाडे होती...कोणी जर प्रश्न केला की फुलांचा राजा कोण? तर निश्चितच बरीचशी मंडळी गुलाब असच उत्तर देतील..अन् आहेच फुलांचा राजा गुलाब...पण मला जर वैयक्तिक प्रश्न विचारला की फुलांची राणी  कोण? तर माझ उत्तर फक्त "पारिजातक" हेच असेल...कारण गुलाब हा १२ ही महीने फुलतो..दिसतो..पण राणी (पारीजातक) माञ दुर्मिळचं फक्त श्रावणात आपल्या फुलांचा पदर अंगणभर पसरवणारी ती एकटीच, कोमल,नाजुक...प्रत्येकाची याबाबतीत विचारशैली वेगवेगळी असु शकते...मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मि पारीजातकाला "राणी" म्हणुन संबोधलं एवढचं...आता तुम्ही म्हणाल मोगरा सोडुन ही पारिजातक का सांगत आहे?...कारण आपल्याला आवडलेल्या गोष्टींचा उल्लेख आपण न राहवुन कुठेही अन् तो मग कशाही पद्धतीने का होइना आपसुकच होत असतो!...
      अंगणातील फुलझाडांमध्ये एकीकडुन पारीजातकाचं अतिशय टुमदार, गोलगोमटं, उंचावरून फुलांचा सडा संपुर्ण अंगणात पसरवुन अंगण सुगंधीत करायचा,तर दुसरीकडुन गुलाब... त्यातही निरनिराळे प्रकार 'गुलाबी गावरान गुलाब',फिकट,गर्द लाल गुलाब, पांढरा गुलाब आपल्या सौंदर्याची उधळण करत असायचा,त्यात भर घातली जायची ती जास्वंदाच्या सौंदर्याने,रूई, अन् सदाफुली...तर अत्यंत प्रिय पिवळं सौंदर्य त्यामध्ये झेंडुची टपोरी तर शेवंतीची नाजुक नाजुक फुले असायची अन् फळझाडांमध्ये आंब्याची छोटी रोपे, तर कन्हेराचं झाड मध्यम आकाराचं असायचं पण त्याला फळं यायची...अन् लहान लहान कुंड्यांमध्ये तुळशीची रोपे असायची...या सर्व फुलझाडांचा अन् फळझाडांचा  एकाच व्यक्तीला लळा असे...ती म्हणजे "माझी आजी"...इतर सदस्य आपापल्या कामात मग्न असायची.
      आजी शिकलेली नाहीये पण झाडे लावायला हवीत अन् ती जगवायला हवीत एवढचं तिला ज्ञान...यापेक्षा अनमोल ज्ञान दुसर कोणतं असु शकतं?...लहान मुले अन् छोटीशी रोपटे सारखीचं त्यांची योग्य देखभाल कशी करायची हे फक्त तिलाच ठाऊक...समोरच्या व्यक्तीला तिच्या बोलण्यात कठोरपणा जाणवतो तसा आम्हालाही जाणवतो पण ज्या व्यक्ती तिला अगदी जवळुन ओळखतात मग ती माणसे असोत किंवा झाडे तिच्या हातातील मायेची, प्रेमाची ऊब फक्त त्यांनाच ठाऊक..अंगणात एवढी झाडे होती.पण मोगरा माञ कधीच फुलला नव्हता.फुलला नव्हता म्हणजे तिने कधी मोगरा लावलाच नाही अंगणात...
    माझ्या बालपणी असलेल्या अंगणात अन् वर्तमानकाळातील अंगणात वेळेनुसार,परीस्थीतीनुसार खुप बदल झालाय आता मोजकीच झाडे उरलेली आहेत...वय झाल्यनंतर ज्याप्रमाणे शरीर क्षीण, होते त्याप्रमाणे पारिजातकाचं झाड अतिशय वयस्कर,जीर्ण झाल्यामुळे तोडावं लागलं...गुलाब माञ आहे त्या ठिकाणीच अन् आहे त्या स्थितीत अजुनही मनसोक्तपणे आपल्या फुलांचा वर्षाव दररोज एक दोन फुलांनी करतच असतो...सदाफुली निरंतर फुलते...तुळशीच्या  रोपांच्या संख्येमध्ये बरीचशी वाढ झालीये...
      माञ २,३ वर्षाआधी आजीने आमच्या समोरील रस्त्याच्या कडेला शेजारील घरामध्ये मोगऱ्याची कलम लावली अन् ती जगवली...त्याची छान छोटी छोटी नाजुक, सुंदर पांढरी फुले येणाऱ्या जाणाऱ्याला मोहीत करतात...आता तर त्याचा वेल खुप उंच गेलाय...उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी त्या वेलाची कटाई (छाटण) करण्यात आली होती...आजीच्या काय मनात आले कुणास ठाऊक तिने त्यातील १,२ कलमा घरी आणल्या व अंगणात आपल्याच हाताने रूजवल्या...ते छोटसं रोप ५,६ दिवस ताजतवानं, हिरवं दिसायच माञ नंतर कोमेजून जायचं.असा तिने बऱ्याचदा प्रयत्न केला मोगरा जगवायचा...पण अपयश...कारण तिला माहीती होत कुठलही रोप इतर ऋतुंपेक्षा वर्षा ऋतुत लवकर लागते अन्  जगते...त्यासाठीच तिचा सर्व खटाटोप चाललेला असायचा मीही कुतुहलाने त्या रूजवलेल्या रोपाला निरखुन पहात असे याची वाट पहात की आता तरी मोगरा जगला पाहीजे..पण प्रत्येकदा निराशाचं...वर्षा ऋतुतील २ महिने संपुन गेले होते तरी अजुनही समाधान झाल नव्हतं, शेवटी एका दिवशी आईने काही कलमा आणल्या अन् रूजवल्या माञ त्याच संगोपन करण्याचं काम आजीचचं...दररोज त्या रोपाला पाणी टाकायची, त्यातील माती उकरून स्वच्छ ठेवायची...यावेळेसही मला वाटल हे पण रोपटं असचं कोमेजुन जाइल त्यामुळे मि त्याकडे दुर्लक्षचं केल...माञ तिने प्रयत्न सोडले नाहीत...यावेळेस आश्चर्यचं वाटल १० दिवस उलटले तरी त्या रोपाला जेवढी जेमतेम पाच,सहा पाने होती ती हिरवीच दिसायची...शेवटी २० दिवस झाले तशीच परिस्थिती...मि पुन्हा उत्कटतेने त्या रोपाला निरखुन बघीतल...नाजुक स्पर्श केला...पण आजी ओरडली 'त्याला हात लावायचा नाही' असं तीने बजावुन सांगितल... नाहीतर आपलीच दृष्ट लागेल त्याला अन् कोमेजून जाईल अस म्हणायची...तिचा नित्यक्रम फक्त एवढाच की ती त्या रोपाला सकाळ संध्याकाळ थोडसं पाणी टाकायची...
     २ महिने झाले तरी त्याची पाने हिरवीचं...जणुकाही एखादं खोडकर बाळ आपल्या आईला ञास देतो,तिचा जीव अगदी मुठीत असतो त्याला सांभाळता सांभाळता...हुबेहुब तसचं काहीस हे रोपटं आम्हाला ञास देत होतं... नविन कोंब माञ अजुनही त्याला दिसत नव्हता...कधी कधी निराश होऊन आई  म्हणायची काही जगत नाही हे रोप...पण आजी ओरडली...ते अजुन थोडा वेळ घेईल...पण जगेल नक्की...काय आश्चर्य! त्यानंतर असचं एक दिवस सकाळी उठल्या उठल्या त्या रोपाला नविन छोटासा अंकुर आलेला दिसला..ज्याप्रमाणे नवजात बाळ आपल्या आईकडे पाहुन हास्य करतो अन् आईसुद्धा त्याच हास्य पाहुन आनंदीत होतेे अगदी त्याचप्रमाणे जणुकाही आमच्याकडे पाहुन तो हसत होता...आम्हालाही त्याचं हसु पाहुन नकळतपणे चेहऱ्यावर आनंदाची खळी खुलल्यासारखं वाटलं..एक नवचैतन्य होत त्या आनंदात...सरतेशेवटी सर्वांच्या तोंडी दोनच शब्द होते..."मोगरा जगला"...
 आता त्याला बरीचशी छोटी छोटी पाने आलेली आहेत...आता तो मोगरा.. किती उंचावर जाईल?, अन् किती फुलेल? किती फुले उधळेल?... हे त्याचं त्यालाच ठाऊक!... आमचं काम फक्त एवढचं त्याची एका लहान मुलाप्रमाणे काळजी घेणं, सांभाळणं अन् जगवणं...
      आज १४ नोव्हेंबर बालकदिन...लहानपणी मुलांच ज्याप्रमाणे संगोपन करायचं असतं.अगदी त्याप्रमाणेच झाडांनाही मायेची, प्रेमाची ऊब हवी असते...त्याशिवाय तेही आपल अस्तित्व तयार करत नाही...
आजच्या बालकदिनाच्या पर्वावरती...आपण आपसुकच म्हणतो 'लहानपण देगा देवा' पण आताच्या मुलांच लहानपण हे कुठेतरी हरवत चाललंय..त्यांना मोबाइलवरचे खेळ जास्त प्रिय वाटतात,निसर्गातील कुतुहल जाणण्यात त्यांना रस वाटत नाही...आज या लेखाच्या अनुशंगाने मला माझ बालपण आठवलं...ज्यांच ज्यांच बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेलेल असेल त्यांनाच त्यातली धन्यता कळेलं अन् निसर्ग आपला सर्वांत जवळचा सखा आहे असचं वाटेलं...बालकदिनाच्या निसर्गमयी शुभकामना!
       

Friday 25 October 2019

    "दिवाळीआधीचा पाऊस"

     राञीची वेळ... जाग आला तेव्हा राञीचे १२ वाजुन काही मिनीटे झाली. अंगणात जाऊन बघीतल तर "पाऊसराजा" रिमझीम रिमझीम बरसत होता!दिवाळीच्या आधीचा हा पाऊस मि तरी पहिल्यांदाच अनुभवत होते, गेले ८ दिवस सुर्यनारायणाने दर्शन दिलेल नव्हतं,अधुन मधुन दुपारच्या वेळेला काय तेवढी उन्हाची किरणे पडत होती. दिवाळीच्या कामांमध्ये या पावसाची हजेरी माझ्या जन्मापासुन मला नवीनच वाटत होती,दिवाळीच्या आधी कामांमध्ये आतापर्यंत अनुभवलेली नेहमीची प्रसन्नता,धन्यता,उल्हासिकता यावेळेस कुठेतरी लांबच्या प्रवासाला गेलेली वाटत होती. शेतीमधील सर्व कामे पावसामुळे खोळंबलेली होती.नेहमिची प्रसन्नता नव्हती त्या बरसण्यात! स्पष्ट ओळखायला येत होते...तो दु:खी असलेला भासत होता...जणुकाही त्याच्या रडण्याचा आभास अलगदपणे होत होता.पण त्याच्या रडण्यात आक्रोश,गडबड,गोंधळ नव्हता! होती ती फक्त नीरव शांतता! आपल्या अश्रुंनी तो या धरतीमातेला ओलचिंब करीत होता...पण त्याच्या टपटप पडणाऱ्या थेंबांचा ञास तिलाही होत असेलच की याची त्याला जराही कल्पना नव्हती. तो माञ केविलवाणा रडतच होता.त्याला खुप काही सांगावस वाटत होत,बोलावस वाटत होत... पण ते सारं काही त्या अश्रुंनी पुसुन जात होत.या सर्वांची साक्ष होती फक्त मि...पहाटेचे ४ वाजले तरी झोप आली नाही.
     निसर्गाची पण अद्भुत किमया आहे जोपर्यंत सर्व निसर्गचक्र सुरळीत तोपर्यंत सर्व ठीक थोडासा जरी समतोल बिघडला,कुठेतरी बिनसल,ऋतुचक्र बिघडले की निसर्गाचे दु:ख सुरू, या सर्व चक्राला माणुसही जबाबदार आहे. त्याचा निसर्गातील हस्तक्षेप खुप महत्वाचा आहे. माणसांच पण तसचं असत नाही...पण त्यापासुन इतरांना ञास होतो, निरअपराध जीवांना ञास होतो याचं त्या निसर्गाला किंवा माणसाला कुठे भान असत...त्या पावसाचे अश्रु पहात पहात पुन्हा डोळे कधी लागले कळालेच नाही...
      पण दिपावली म्हणजेच प्रकाशाचा उत्सव...अंधारातुन तेजाकडे जाण्याचा मार्ग. थोडस मंथन केल अन् निसर्गाचा हा ढाचा समजुन घेतला तर त्यावरही मानवाला निश्चितच मात करता येईल याबाबत शंका नाही.निसर्गातील सर्वांत हानीकारक बाब कोणती? हा प्रश्न जर उपस्थित केला तर "प्रदुषण" हे मापक उत्तर देता येइल...निसर्गातील प्रदुषणामुळेच निसर्गाचा समतोल बिघडत आहे अन् त्यामुळेच ऋतुचक्रावरती परिणाम होत आहे ही साधी गोष्ट मानवाच्या कधी लक्षात येईल?...
येणाऱ्या दिवाळीतही सर्वांनी पर्यावरणपुरक, निसर्गाला समजुन प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा थोड्या प्रमाणात जरी निश्चय केला... तर ही  दिवाळी "निसर्गमयी" साजरी केल्याचं समाधान मिळेल...अन् अंधारातुन तेजोमयी प्रकाश निश्चितच प्रेरणादायी ठरेल!
सर्वांना दिपावलीच्या निसर्गमयी शुभकामना!

Wednesday 14 August 2019

"तिरंगात पारिजात"

                 "तिरंगात पारिजात"

         "तिरंगा" ज्याप्रमाणे  मुक्तहस्तपणे,स्वतंत्रपणे आकाशात लहरत असतो.. अगदी त्याचप्रमाणे पारिजातकाची फुले 'मनसोक्तपणे' आपला सडा अंगणभर पसरवत असतात... पारीजातकाच्या फुल झाडाविषयी आश्चर्यकारक अशी समानता अनुभवता येईल ती म्हणजे आपल्या भारत देशाच्या तिरंग्यात असलेले रंग ! कौतुक करायचं झालं तर पारिजातकाच्या फुलझाडाचचं करावं लागेल निसर्गाने पारिजातकाच्या झाडाला जन्म दिला,पालवी फोडली, वाढवलं.. मात्र पारिजातकाच्या फुलांना बहर येतो तो वर्षा ऋतूमध्ये म्हणजे जेमतेम मराठी महिन्यातील श्रावणात, तर इंग्रजी महिन्यातील ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान...स्वातंञ्य दिन (१५ ऑगस्ट) याच वर्षा ऋतूमध्ये येतो...तिरंग्यात असलेली तीनही रंग पारिजातकाच्या फुल झाडांमध्ये आढळतात फुलांच्या देठाचा "केशरी" रंग हा 'त्याग अन् शौर्याचे' प्रतिक तर "पांढरा" रंग हा पाकळ्यांचा असतो म्हणजे 'शांतीचे' प्रतीक आणि "हिरवा" रंग असतो पानांचा जो इतरही सर्व झाडांमध्ये पहायला मिळतो..हिरव्या रंगाचे महत्त्व म्हणजे 'समृद्धीकडे' वाटचाल म्हणजेच श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरलेलीे असते संपूर्ण 'धारा'...हिरवा शालू पांघरलेलीे असते! निश्चितच समृद्धी घेऊन येणारा महिना म्हणजे श्रावण, वर्षा ऋतू ! तुम्ही म्हणाल "निळा" रंग कुठे आहे? निश्चितच आहे! निसर्गातील विशाल, अनंत आभाळाचा... प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांना तो सुचवत असतो २४ तास प्रगतीकडे वाटचाल करावी...न थांबता, न थकता कशाचीही भीती न बाळगता!
        असा हा "तिरंगा" अन् "पारिजात" वैशिष्ट्यपूर्णतेने अन् परिपूर्णतेने भरलेला... पारिजातक फुलझाडांरुपी आपणही या "झाडातील झेंड्याला" तिरंग्याला अन् "निसर्गाला" वंदन करून स्वातंञ्य दिन साजरा करूया ! 
     स्वातंञ्य दिन अन् रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने हा दिवस पारिजातकाच्या फुलांरुपी शोभुन उठला आहे! देशाची अन् पर्यावरणाची रक्षा करणे ही दृढ संकल्पना मनात निर्माण करण्याचा आजचा दिवस!              सर्वांना स्वातंञ्य दिनाच्या अन् रक्षाबंधनच्या  नाजुक,कोमल,सोज्वळ, सुंदर पारीजातकमय शुभेच्छा!

Tuesday 6 August 2019

"मैञी निसर्गाशी"

                  "मैञी निसर्गाशी"

  "ताडोबा जंगल...एक अविस्मरणीय सहल"...

     "जागतिक व्याघ्र दिनाचं औचित्य"... नुकत्याच २९ जुलै रोजी झालेल्या व्याघ्र दिनाला माननीय 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' यांनी दिलेल्या भाषणात सांगितल यावर्षी वाघांच्या संख्येत मागील ९ वर्षाच्या तुलनेत वाढ झालेली आढळली...त्यांनी दोन चिञपटांची नावे घेऊन ही आनंदाची बाब उपस्थीतांना दर्शविण्याचा प्रयत्न केला, पहिला ' एक था टाइगर' अन् त्यानंतरचा ' टाइगर अभी जिंदा है'...अन् येणाऱ्या वर्षांत वाघांची संख्या दुपटीने वाढेल हा विश्वासही दिला. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या चिञफीतीमध्ये ते 'वाइल्ड लाइफ एडवेंचर' प्रवासाला गेलेले दिसले."बीयर ग्रील्स स्टारर" (मैन vs वाइल्ड) हा कार्यक्रम खुपच लोकप्रिय आहे! यामध्ये भारतातील वाइल्ड लाइफला महत्त्व देऊन तयार करण्यात आलेला कार्यक्रम ज्यामध्ये 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' अन् त्यांच्याबरोबर नेहमी निसर्गाच्या सानिध्यात असलेले 'बीयर ग्रील्स' हे असणार आहेत! डीस्कवरी चॅनलवरती १२ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम प्रदर्शीत होणार आहे...
    अशाच एका मुलाखतीमध्ये "मोदी" यांना प्रश्न विचारण्यात आला होता...तुम्ही लहानपणी खुप खोडकर होते? त्याला कारणही तसचं होत..त्यांनी म्हणे तलावातुन मगरीचे पिल्लु घरी खेळायला आणल होत.यावर त्यांनी उत्तर दिल म्हणाले याला खोडकर नाही म्हणता येणार पण "साहसी" नक्कीच म्हणता येईल...हा अनुभव सांगण्यामागचे कारण हे की माझ्या लहानपणी मलाही संधी मिळाली होती ती व्याघ्र अभयारण्यात जाण्याची...१,२ दिवसासाठी नव्हे तर तब्बल ७ दिवसासाठी!
    २०१० वर्षी साजरा होत होता.."ताडोबा महोत्सव"!महाराष्ट्र सरकारने ७ दिवसाचं 'पर्यावरण जाणीव जागृती शिबीर' आयोजित केल होतं. वाघाबद्दल जवळीक साधण्याची,त्यांच अस्तित्व जंगलात जाऊन अनुभवायची 'सोनेरी संधी' मला त्यावेळी मिळाली होती! पंतप्रधानांची ती छोटीसी ३० सेकंदाची चिञफित ज्यामध्ये रोमांच,भयानकता,उत्कंठा,आनंद अशी कितीतरी दृश्ये बघीतली अन् मलाही माझ्या त्या जंगलातील प्रवासाची आठवण झाली...माझा हा प्रवास वाचुन तुम्हालाही जंगलात जाऊन आल्यासारखं निश्चितच वाटेलं!...
     नविन वर्ष २०१० जानेवारी महिन्यातील  पहिलाच आठवडा! कडाक्याची थंडी पडलेली...मी इयत्ता ८ वी मध्ये होती! दररोजप्रमाणे पटांगणावरील राष्ट्रगीत,परिपाठ संपुन आपापल्या वर्गात बसल्यावर मुख्याध्यापक बाईंनी मला व माझ्या सहमैञीणीला बोलावुन सांगितल तुम्हा दोघींची "ताडोबा महोत्सव" शिबीरासाठी निवड करण्यात आलेली आहे, तुमच्याबरोबर पर्यावरण विषयाचे शिक्षक सुद्धा असणार आहेत! महाराष्ट्र राज्यातील एकुण ३६ जिल्ह्यातील इयत्ता ८ मधील २ विद्यार्थी असे एकुण ७२ विद्यार्थी अन् त्यांच्याबरोबर एक पर्यावरण शिक्षक म्हणजे ३६ शिक्षक असा संघ तिथे आमच्या सोबतीला असणार होता! कदाचीत पर्यावरण विषयक उपक्रम अन् प्रकल्प उत्कृष्टरीत्या राबविल्याबद्दल अकोल्या जिल्ह्यातुन आमच्या शाळेची निवड केली असावी. खर तर बाईंनी 'निसर्ग सहल' म्हणताच माझ मन हरखुन गेलं होतं त्याला कारणही तसचं होत...मागच्या इयत्तेत असताना पावसाळ्यात शाळेची सहल गेली होती ती आकोट तालुक्यातील "नरनाळा किल्ल्यावर", जाताना प्रसिद्ध असलेल पोपटखेडचं धरण अन् धारगड येथे असलेला धबधबा बघायला मिळाला होता..तेव्हाची ती एका दिवसाची सहल मनाला स्पर्शुन गेली होती, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाला जवळुन अनुभवता आल होतं...
     ताडोबाला जायची तारीख निश्चीत झाली १७ जानेवारी शिबीराच्या आदल्या दिवशी संध्याकाळी निघायचं होतं..त्या राञी २ वाजता दरम्यान अकोल्यावरून चंद्रपुरला निघालो...प्रवासाला सुरूवात झाली! बस धावत होती ती एका नव्या ध्येयाकडे जाण्यासाठी! एवढ्या राञी बसमधला तो माझा पहिलाच प्रवास असावा! कडाड्याची थंडी पडलेली!अंगाला थंडगार वारा झोंबत होता.. साधारणत: पहाटेचे ५ वाजलेले असावेत बसच्या खिडकीतुन बघीतले तर दाट धुके पडलेले! कधी डोंगरमाथा तर कधी सपाट जमिनीवरुन बस पळत होती! थोडावेळ निघुन गेल्यावर एका डोंगरमाथ्याच्या अगदी मधोमध लालकेशरी रंगाचा गोळा वर येताना दिसत होता तसा सुर्य मि त्याआधी फक्त चिञातच बघीतलेला आठवत होता!अतिशय मनमोहक, प्रसन्न,विहंगम अशी नविन वर्षातील 'पहाट' मी त्या दिवशी १८जानेवारी ला अनुभवली होती...त्यानंतर खुप उशीरा दुपारी चंद्रपुरला पोहोचलो!तिथल्या फॉरेस्ट ऑफिसमधल्या गाडीमधुन आम्ही निघालो ते मोहर्ली खेडेगावाजवळ असलेल्या ताडोबाच्या जंगलात...
      देशातील एक सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प म्हणून याचा लौकीक आहे.या जंगलात वाघाचे दर्शन अगदी सहज होते अशी या जंगलाची प्रसिद्धी आहे..केवळ वाघ दर्शनाने हे जंगल प्रसिद्ध असले तरी या जंगलातील जैविक विविधता अत्यंत समृद्ध आहे.राज्यातील "पहिले राष्ट्रीय उद्यान" म्हणुनही याचा आणखी एक लौकीक आहे!...
     ताडोबात पोहोचलो तेव्हा संध्याकाळी ५ वाजता आम्ही निसर्ग भ्रमणाला सुरूवात केली एका तलावाजवळ हरिण,मोर अन् विविध पक्षी पहायला मिळाले.नंतर आमची गाडी अडवली ती भेकर या प्राण्याने अत्यंत चपळ असल्याने लगेच गाडीच्या आवाजाने ते सावध झाल असाव त्याने लगेच तेथुन पळ काढला त्या भ्रमणात पहिल्याच दिवशी मला कळाल की प्राण्यांच्या मनात माणसाबद्दल किती भिती निर्माण झालीय! निसर्गातील त्या  संध्याकाळी खुप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या!
      दुसऱ्या दिवशी १९ तारखेला सकाळी ७ वाजता निसर्ग भ्रमणाला निघालो तेही पायी..वेगवेगळ्या विभागाचे गट तयार करण्यात आले होते आमच्या गटाचे नाव होते "वनपिंगळा गट"! आकाश निरभ्र अन् हवामान अतिशय थंड होत! 'पक्षी निरीक्षण' हा त्यादिवशीचा विषय..पक्षी निरीक्षण ही निसर्ग निरीक्षणातील पहिली पायरी आहे त्यामुळे जेवढ्या चिकाटीने, बारकाइने त्यांचे निरीक्षण करता येईल तेवढ चांगल..विविध पक्षी त्यादिवशी निरीक्षणात आले करकोचा,मधुबाज,बुलबुल,होली तसेच खंड्या पक्षी,कोतवाल,पिवळ्या गळ्याची चिमणी,कापसी पण सर्वांत जास्त लक्ष वेधल ते "सारस पक्ष्याने"! हा पक्षी भारतातील सर्वांत उंच पक्षी असुन त्याला (राम-लक्ष्मण) असही म्हणतात.झाडांच्या बाबतीत बोलायच तर निसर्गातील महत्वाचा दुवा म्हणजे 'वनस्पती,झाडं'.जवळपास ८०% औषधे ही वनस्पतीपासुन तयार होतात...भराटी,भेरा,साग,बांबु,पांढरा फेटरा,कवटा लोखंडी इत्यादी विविध वनस्पती अन् झाडं आम्हाला निरीक्षणात आढळली अन् सरांनी या सर्व झाडांचे कोणते उपयोग आपल्याला सामान्य जीवनात होतात याची सुद्धा माहीती दिली...संध्याकाळी शुभ्र चांदण्यांच्या छताखाली व्याख्यानामध्ये भारतातील अभयारण्यांची माहीती देण्यात आली...
      तिसऱ्या दिवशी २० तारखेला सकाळी ६ वाजुन ४५ मिनिटांनी निसर्ग भ्रमंतीला निघालो यादिवशीचा विषय होता "फुलपाखरू", लहानपणापासुन या किटकाच्या मागे आपले मन धावत असते.फुलांवर भिरभिरणारे फुलपाखरू बघुन आपण देहभान हरपुन जातो.कोणत्या झाडावर कोणते फुलपाखरू असते किंवा सहसा आढळते याची माहीती त्या दिवशी आम्हाला देण्यात आली! त्या दिवशी दुपारी विविध प्राण्यांच्या खाणाखुणा कशाप्रकारे ओळखायच्या हे शिकविले...हरीण कुळातील प्राणी,कुरंग कुळातील प्राणी त्यांचे वसतीस्थान कशाप्रकारे असते...जंगलातील शाळाच आम्ही त्या दिवशी अनुभवली होती!
      चौथ्या दिवशी २१ तारखेला सकाळी पर्यटन बसमधुन निसर्ग भ्रमणाला जायच होत,अगदी घनदाट जंगलात...सुचना देताना सर बोलुन गेले होते आज वाघाचे दर्शन होऊ शकेल पण त्यालाही नशिबाची साथ महत्वाची होती...खुप आतुरता होती त्या प्रवासात...सुरूवातीला सांबर,भेकर,हरीण इत्यादी विविध प्राणी अन् पक्ष्यांसोबत आमची भेट झाली थोडावेळानंतर आमची बस अचानक एकदम थांबली..नंतर समोर बघीतले तेव्हा लक्षात आले...आम्हाला दर्शन दिले होते ते " जंगलाच्या राजाने" बसमधील सर्वांना आनंदाचा पारावारच नव्हता कारण तीन दिवस झाले ज्या क्षणाची आतुरतेने आम्ही वाट पहात होतो तो क्षण प्रत्यक्ष अनुभवत होतो...अंगावर एक रोमांच उभा होता...सरांनी मध्येच शांत स्वरात सर्वांना सांगितले आवाज करू नका नाहीतर तो भितीपोटी निघुन जाइल नाहीतर आपल्या बसवर हल्ला करेल...एकीकडे भितीसुद्धा वाटत होती..आधी त्याने बससमोरील संपुर्ण रस्ता ओलांडला,थोडावेळ त्याने संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, इकडे तिकडे बघीतले त्यानंतर बसकडे बघीतले... त्याला बसचा अंदाज आला असावा व त्याने परतीच्या मार्गावर आपली वाटचाल सुरू केली अन् जंगलात निघुन गेला...आम्ही सर्वांनी पहिल्यांदा एवढ्या जवळुन जंगलात निर्भयपणे वाघाला वावरताना बघीतले होते..तो क्षण अविस्मरणीय असाच होता...त्यानंतर संपुर्ण बसमध्ये त्याबद्दलच चर्चा सुरू झाली अन् ती बंद झाली सरतेशेवटी दुपारच्या सञात. दुपारच्या सञात आम्हाला प्लॅस्टीकचा वापर कसा टाळावा? त्यावर कोणते उपाय करता येतील? या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.त्यावेळी आम्ही कागदी पिशवी,फाईल्स,पक्षी,प्राणी असं विविध हस्तकलेचं सामान बनविलं! निसर्गातील पानं,फुल,पालापाचोळा,वाळलेल्या काड्या यांपासुन "गवा" या प्राण्याचे कोलाज तयार केले तर गटाच्या शिक्षक प्रमुखांनी "वनपिंगळा" हा पक्षी तयार केला! संध्याकाळी फिल्म शो बघीतला, दिवस अतिशय आनंदात गेला...
       पाचव्या दिवशी २२ तारखेला सकाळी ७ वाजता जंगलातील आवारात जमलो आज आम्हाला जंगलानजीकच्या 'मोहर्ली' या खेडेगावात जाऊन "लाकुड नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर" या विषयावर माहीती मिळवायची होती..तिथल्या स्थानिक रहिवास्यांशी संवाद साधुन तिथल्या अडचणी जाणुन घेतल्या..तिथल्या छोट्या मुलांशी गप्पा मारुन खुप छान वाटलं! दुपारी मुर्तिकाम केल त्यामध्ये विविध आकारांच्या मुर्ति बनविल्या! मातीच अन् आपल एक घट्ट नातं आहे ही जाणीव त्यावेळी झाली!
 सहाव्या दिवशी २३ तारखेला बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला.ज्यामध्ये मान्यवर म्हणुन चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,बरेचशे प्रमुख पाहुणे,मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते! आमच्या गटाला उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल बक्षिस मिळालं!...
      शेवटच्या दिवशी परतीच्या वेळेस सर्वांना नदी, तलावातील जलजीवनाबद्दल प्रत्यक्ष जाऊन माहीती सांगितली...पंतप्रधांनांसारख आम्हाला कुठलाही जीव घरी घेऊन जायला अनुमती नव्हती पण ताडोबातील एक आठवण म्हणुन आम्ही वाळुतील शंख,शिंपले गोळा करून आपापल्या बॅगेत भरली...त्या जंगलातुन परतीच्या वेळेस खरोखरचं पाय जड झाले होते!
       घर,शाळा,गाव सोडुन निसर्गाच्या शाळेत अनुभवलेले ते क्षण खुपच आनंदाचे, व नाविन्यपुर्ण होते! मला पहिल्यांदा तिथे गेल्यावर कळालं की जंगलात नुसत पर्यटनासाठी नाही तर निसर्ग अन् आपल नातं सुदृढ करण्यासाठी जायचं असत.निसर्ग भ्रमणाचा उद्देश हा निसर्गात फिरून निसर्गाचे महत्त्व समजावुन घेणे हा असतो.निसर्गाची भव्यता,विविधता,सौंदर्य यांची अनुभुती घेणे हा असतो...नुकताच मैञी दिन साजरा करण्यात आला...पण मला अस मनापासुन वाटतं निसर्गाव्यतिरीक्त आपला जवळचा मिञ कोणीही असु शकत नाही कधी कधी ज्या गोष्टी इतर कुठेही शिकायला मिळत नाहीत त्या गोष्टी निसर्ग आपल्याला नकळतपणे आपल्या सौंदर्याची उधळण करत शिकवतो! निसर्गाशी मैञी ही एक पर्वणीच आहे ज्याला मिळाली त्याने तिचे सोने करून घ्यायला हवेचं!
     

Monday 29 July 2019

"श्रावणाचे स्वागत...पारिजातक सोबत"...

  "श्रावणाचे स्वागत...पारिजातक सोबत"...

      " वसंत ऋतुत फुललेला पळस... तर वर्षा ऋतुत बहरलेला पारिजातक "...
   वसंतारंभी बहरलेला पळस सर्वांचे लक्ष वेधुन ज्याप्रमाणे वसंतोत्सवाला सुरूवात करतो...हुबेहुब त्यातच अनुकरण करत पारिजातकाची फुले आरंभ करतात ती श्रावणोत्सवाला!दोन्ही ऋतुच्या अन् फुलांच्या पहिल्या अक्षरात जरी साम्य आढळत असल तरी दोहोंमध्ये खुप विरोधाभास आहे...
     वसंतात रखरखत्या उन्हात निरभ्र निळ्या आकाशी केशरी रंगाची पळसाची फुले जशी "डोळ्यांना आकर्षित" करतात अगदी त्याच्या विरूद्ध वर्षा ऋतुत राञीच्या काळ्याभोर अंधारात, सोबतीला गुणगुणणारी रातकिडे तर कधी आकाशी असलेली ढगांची वर्दळ त्यात मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट कधीकधी तर अंगाला झोंबणारा गारवा, रिमझीम पाऊस अन् ओल्या मातीचा सुवास अशा श्रावणात अंगणातील पडलेली पारिजातकाची पांढरी शुभ्र सोज्वळ फुले "मनाला मोहीत" करतात...
     भरदिवसा फुलणारी पळसाची फुले अन् अंधाऱ्या राञी बहरलेला प्राजक्त!...एवढा विरोधाभास असून दोन्ही फुलांमध्ये अजुन समानता आहे... तुम्ही विचारात पडला असेल मि विरोधाभास दर्शवण्याचा प्रयत्न करीत आहे की साम्य दर्शवण्याचा! मुळात मला दर्शवायच आहे निसर्गाचं निसर्गाशी असलेल नातं!
     तर दोन्ही फुलांमध्ये समानता कोणती तर तुम्ही म्हणाल दोन्ही फुलांमध्ये असलेली 'औषधी गुणधर्म'...निश्चितच आहेत! पण अजुन दोन्ही फुलांमधील साम्य म्हणजे दोन्ही फुले निगडीत आहेत ती "भगवान श्रीकृष्णाशी"... एक सहभाग घेतो 'जन्माष्ठमी उत्सवात' तर दुसर फुल 'रंगोत्सवात' स्वत:ला भागी करून घेत ं...आगळीकतेची गोष्ट म्हणजे वसंत ऋतुत बहरलेली पळसाची फुले सुरूवात करून देतात ती चैञ महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्याला (नविन वर्षाला)...तर श्रावणात सडा शिंपणाऱ्या पारिजातकाची फुले सण, उत्सव, व्रतांना आरंभ करतात... श्रावण मासात अन् इतरही कधी पाऊस पडला तर कधी न आठवणाऱ्या पण बालपणापासुन बाबांकडुन खुपदा ऐकलेल्या ओळी अलगद ओठांवर आल्यावाचुन राहत नाहीत...
   " श्रावणमासी हर्ष मानसी, 
       हिरवळ दाटे चोहीकडे...
       क्षणात येते सरसर शिरवे,
       क्षणात फिरूनी ऊन पडे"...
    लहानपणापासुन बालवयात झालेले संस्कार, शिस्त, बोलणं,वागणं आपण कधीही विसरू शकत नाही, अगदी त्याप्रमाणे 'निसर्ग'आपल्याला नकळतपणे खुप काही शिकवुन जातो! ज्याप्रमाणे अंधाऱ्या काळोख्या राञी चांदण्यांच्या शुभ्र प्रकाशात पारिजातकाची कोमल, नाजुकशी, टपोरी फुले आपल्या फुलांचा सडा अंगणभर पसरवुन त्या राञी प्रकाशाचा एक किरण,जणुकाही वरती आभाळात असलेली चांदणे या जमिनीवर खाली पारिजातकाच्या फुलांच्या रुपात येऊन आपला दरवळ सगळीकडे पसरवुन मनाला एका अनोख्या तेजाकडे घेऊन जातो अन् पहाटे उठल्या उठल्या तो फुलांचा सडा पाहुन जगण्याची नवी प्रेरणा मिळते...
    तर निसर्गाच्या स्वागताकरिता सज्ज असलेल्या श्रावणातील पारिजातकाच्या फुलांरूपी आपणही निसर्गाचे अन् येणाऱ्या श्रावणाचे स्वागत करून नवा आरंभ करून जगण्याला एक नवी दिशा देऊ...
      माझ्या या लिखाणाला सर्वस्वी जबाबदार असलेल्या निसर्गाचे मनस्वी आभार! कधी कधी काही आठवणी मनात घर करून राहतात त्यांनाच या लिखाणाद्वारे स्वतंञ वाट मोकळी करून दिलीयं...