Tuesday 6 August 2019

"मैञी निसर्गाशी"

                  "मैञी निसर्गाशी"

  "ताडोबा जंगल...एक अविस्मरणीय सहल"...

     "जागतिक व्याघ्र दिनाचं औचित्य"... नुकत्याच २९ जुलै रोजी झालेल्या व्याघ्र दिनाला माननीय 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' यांनी दिलेल्या भाषणात सांगितल यावर्षी वाघांच्या संख्येत मागील ९ वर्षाच्या तुलनेत वाढ झालेली आढळली...त्यांनी दोन चिञपटांची नावे घेऊन ही आनंदाची बाब उपस्थीतांना दर्शविण्याचा प्रयत्न केला, पहिला ' एक था टाइगर' अन् त्यानंतरचा ' टाइगर अभी जिंदा है'...अन् येणाऱ्या वर्षांत वाघांची संख्या दुपटीने वाढेल हा विश्वासही दिला. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या चिञफीतीमध्ये ते 'वाइल्ड लाइफ एडवेंचर' प्रवासाला गेलेले दिसले."बीयर ग्रील्स स्टारर" (मैन vs वाइल्ड) हा कार्यक्रम खुपच लोकप्रिय आहे! यामध्ये भारतातील वाइल्ड लाइफला महत्त्व देऊन तयार करण्यात आलेला कार्यक्रम ज्यामध्ये 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' अन् त्यांच्याबरोबर नेहमी निसर्गाच्या सानिध्यात असलेले 'बीयर ग्रील्स' हे असणार आहेत! डीस्कवरी चॅनलवरती १२ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम प्रदर्शीत होणार आहे...
    अशाच एका मुलाखतीमध्ये "मोदी" यांना प्रश्न विचारण्यात आला होता...तुम्ही लहानपणी खुप खोडकर होते? त्याला कारणही तसचं होत..त्यांनी म्हणे तलावातुन मगरीचे पिल्लु घरी खेळायला आणल होत.यावर त्यांनी उत्तर दिल म्हणाले याला खोडकर नाही म्हणता येणार पण "साहसी" नक्कीच म्हणता येईल...हा अनुभव सांगण्यामागचे कारण हे की माझ्या लहानपणी मलाही संधी मिळाली होती ती व्याघ्र अभयारण्यात जाण्याची...१,२ दिवसासाठी नव्हे तर तब्बल ७ दिवसासाठी!
    २०१० वर्षी साजरा होत होता.."ताडोबा महोत्सव"!महाराष्ट्र सरकारने ७ दिवसाचं 'पर्यावरण जाणीव जागृती शिबीर' आयोजित केल होतं. वाघाबद्दल जवळीक साधण्याची,त्यांच अस्तित्व जंगलात जाऊन अनुभवायची 'सोनेरी संधी' मला त्यावेळी मिळाली होती! पंतप्रधानांची ती छोटीसी ३० सेकंदाची चिञफित ज्यामध्ये रोमांच,भयानकता,उत्कंठा,आनंद अशी कितीतरी दृश्ये बघीतली अन् मलाही माझ्या त्या जंगलातील प्रवासाची आठवण झाली...माझा हा प्रवास वाचुन तुम्हालाही जंगलात जाऊन आल्यासारखं निश्चितच वाटेलं!...
     नविन वर्ष २०१० जानेवारी महिन्यातील  पहिलाच आठवडा! कडाक्याची थंडी पडलेली...मी इयत्ता ८ वी मध्ये होती! दररोजप्रमाणे पटांगणावरील राष्ट्रगीत,परिपाठ संपुन आपापल्या वर्गात बसल्यावर मुख्याध्यापक बाईंनी मला व माझ्या सहमैञीणीला बोलावुन सांगितल तुम्हा दोघींची "ताडोबा महोत्सव" शिबीरासाठी निवड करण्यात आलेली आहे, तुमच्याबरोबर पर्यावरण विषयाचे शिक्षक सुद्धा असणार आहेत! महाराष्ट्र राज्यातील एकुण ३६ जिल्ह्यातील इयत्ता ८ मधील २ विद्यार्थी असे एकुण ७२ विद्यार्थी अन् त्यांच्याबरोबर एक पर्यावरण शिक्षक म्हणजे ३६ शिक्षक असा संघ तिथे आमच्या सोबतीला असणार होता! कदाचीत पर्यावरण विषयक उपक्रम अन् प्रकल्प उत्कृष्टरीत्या राबविल्याबद्दल अकोल्या जिल्ह्यातुन आमच्या शाळेची निवड केली असावी. खर तर बाईंनी 'निसर्ग सहल' म्हणताच माझ मन हरखुन गेलं होतं त्याला कारणही तसचं होत...मागच्या इयत्तेत असताना पावसाळ्यात शाळेची सहल गेली होती ती आकोट तालुक्यातील "नरनाळा किल्ल्यावर", जाताना प्रसिद्ध असलेल पोपटखेडचं धरण अन् धारगड येथे असलेला धबधबा बघायला मिळाला होता..तेव्हाची ती एका दिवसाची सहल मनाला स्पर्शुन गेली होती, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाला जवळुन अनुभवता आल होतं...
     ताडोबाला जायची तारीख निश्चीत झाली १७ जानेवारी शिबीराच्या आदल्या दिवशी संध्याकाळी निघायचं होतं..त्या राञी २ वाजता दरम्यान अकोल्यावरून चंद्रपुरला निघालो...प्रवासाला सुरूवात झाली! बस धावत होती ती एका नव्या ध्येयाकडे जाण्यासाठी! एवढ्या राञी बसमधला तो माझा पहिलाच प्रवास असावा! कडाड्याची थंडी पडलेली!अंगाला थंडगार वारा झोंबत होता.. साधारणत: पहाटेचे ५ वाजलेले असावेत बसच्या खिडकीतुन बघीतले तर दाट धुके पडलेले! कधी डोंगरमाथा तर कधी सपाट जमिनीवरुन बस पळत होती! थोडावेळ निघुन गेल्यावर एका डोंगरमाथ्याच्या अगदी मधोमध लालकेशरी रंगाचा गोळा वर येताना दिसत होता तसा सुर्य मि त्याआधी फक्त चिञातच बघीतलेला आठवत होता!अतिशय मनमोहक, प्रसन्न,विहंगम अशी नविन वर्षातील 'पहाट' मी त्या दिवशी १८जानेवारी ला अनुभवली होती...त्यानंतर खुप उशीरा दुपारी चंद्रपुरला पोहोचलो!तिथल्या फॉरेस्ट ऑफिसमधल्या गाडीमधुन आम्ही निघालो ते मोहर्ली खेडेगावाजवळ असलेल्या ताडोबाच्या जंगलात...
      देशातील एक सुप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प म्हणून याचा लौकीक आहे.या जंगलात वाघाचे दर्शन अगदी सहज होते अशी या जंगलाची प्रसिद्धी आहे..केवळ वाघ दर्शनाने हे जंगल प्रसिद्ध असले तरी या जंगलातील जैविक विविधता अत्यंत समृद्ध आहे.राज्यातील "पहिले राष्ट्रीय उद्यान" म्हणुनही याचा आणखी एक लौकीक आहे!...
     ताडोबात पोहोचलो तेव्हा संध्याकाळी ५ वाजता आम्ही निसर्ग भ्रमणाला सुरूवात केली एका तलावाजवळ हरिण,मोर अन् विविध पक्षी पहायला मिळाले.नंतर आमची गाडी अडवली ती भेकर या प्राण्याने अत्यंत चपळ असल्याने लगेच गाडीच्या आवाजाने ते सावध झाल असाव त्याने लगेच तेथुन पळ काढला त्या भ्रमणात पहिल्याच दिवशी मला कळाल की प्राण्यांच्या मनात माणसाबद्दल किती भिती निर्माण झालीय! निसर्गातील त्या  संध्याकाळी खुप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या!
      दुसऱ्या दिवशी १९ तारखेला सकाळी ७ वाजता निसर्ग भ्रमणाला निघालो तेही पायी..वेगवेगळ्या विभागाचे गट तयार करण्यात आले होते आमच्या गटाचे नाव होते "वनपिंगळा गट"! आकाश निरभ्र अन् हवामान अतिशय थंड होत! 'पक्षी निरीक्षण' हा त्यादिवशीचा विषय..पक्षी निरीक्षण ही निसर्ग निरीक्षणातील पहिली पायरी आहे त्यामुळे जेवढ्या चिकाटीने, बारकाइने त्यांचे निरीक्षण करता येईल तेवढ चांगल..विविध पक्षी त्यादिवशी निरीक्षणात आले करकोचा,मधुबाज,बुलबुल,होली तसेच खंड्या पक्षी,कोतवाल,पिवळ्या गळ्याची चिमणी,कापसी पण सर्वांत जास्त लक्ष वेधल ते "सारस पक्ष्याने"! हा पक्षी भारतातील सर्वांत उंच पक्षी असुन त्याला (राम-लक्ष्मण) असही म्हणतात.झाडांच्या बाबतीत बोलायच तर निसर्गातील महत्वाचा दुवा म्हणजे 'वनस्पती,झाडं'.जवळपास ८०% औषधे ही वनस्पतीपासुन तयार होतात...भराटी,भेरा,साग,बांबु,पांढरा फेटरा,कवटा लोखंडी इत्यादी विविध वनस्पती अन् झाडं आम्हाला निरीक्षणात आढळली अन् सरांनी या सर्व झाडांचे कोणते उपयोग आपल्याला सामान्य जीवनात होतात याची सुद्धा माहीती दिली...संध्याकाळी शुभ्र चांदण्यांच्या छताखाली व्याख्यानामध्ये भारतातील अभयारण्यांची माहीती देण्यात आली...
      तिसऱ्या दिवशी २० तारखेला सकाळी ६ वाजुन ४५ मिनिटांनी निसर्ग भ्रमंतीला निघालो यादिवशीचा विषय होता "फुलपाखरू", लहानपणापासुन या किटकाच्या मागे आपले मन धावत असते.फुलांवर भिरभिरणारे फुलपाखरू बघुन आपण देहभान हरपुन जातो.कोणत्या झाडावर कोणते फुलपाखरू असते किंवा सहसा आढळते याची माहीती त्या दिवशी आम्हाला देण्यात आली! त्या दिवशी दुपारी विविध प्राण्यांच्या खाणाखुणा कशाप्रकारे ओळखायच्या हे शिकविले...हरीण कुळातील प्राणी,कुरंग कुळातील प्राणी त्यांचे वसतीस्थान कशाप्रकारे असते...जंगलातील शाळाच आम्ही त्या दिवशी अनुभवली होती!
      चौथ्या दिवशी २१ तारखेला सकाळी पर्यटन बसमधुन निसर्ग भ्रमणाला जायच होत,अगदी घनदाट जंगलात...सुचना देताना सर बोलुन गेले होते आज वाघाचे दर्शन होऊ शकेल पण त्यालाही नशिबाची साथ महत्वाची होती...खुप आतुरता होती त्या प्रवासात...सुरूवातीला सांबर,भेकर,हरीण इत्यादी विविध प्राणी अन् पक्ष्यांसोबत आमची भेट झाली थोडावेळानंतर आमची बस अचानक एकदम थांबली..नंतर समोर बघीतले तेव्हा लक्षात आले...आम्हाला दर्शन दिले होते ते " जंगलाच्या राजाने" बसमधील सर्वांना आनंदाचा पारावारच नव्हता कारण तीन दिवस झाले ज्या क्षणाची आतुरतेने आम्ही वाट पहात होतो तो क्षण प्रत्यक्ष अनुभवत होतो...अंगावर एक रोमांच उभा होता...सरांनी मध्येच शांत स्वरात सर्वांना सांगितले आवाज करू नका नाहीतर तो भितीपोटी निघुन जाइल नाहीतर आपल्या बसवर हल्ला करेल...एकीकडे भितीसुद्धा वाटत होती..आधी त्याने बससमोरील संपुर्ण रस्ता ओलांडला,थोडावेळ त्याने संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, इकडे तिकडे बघीतले त्यानंतर बसकडे बघीतले... त्याला बसचा अंदाज आला असावा व त्याने परतीच्या मार्गावर आपली वाटचाल सुरू केली अन् जंगलात निघुन गेला...आम्ही सर्वांनी पहिल्यांदा एवढ्या जवळुन जंगलात निर्भयपणे वाघाला वावरताना बघीतले होते..तो क्षण अविस्मरणीय असाच होता...त्यानंतर संपुर्ण बसमध्ये त्याबद्दलच चर्चा सुरू झाली अन् ती बंद झाली सरतेशेवटी दुपारच्या सञात. दुपारच्या सञात आम्हाला प्लॅस्टीकचा वापर कसा टाळावा? त्यावर कोणते उपाय करता येतील? या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.त्यावेळी आम्ही कागदी पिशवी,फाईल्स,पक्षी,प्राणी असं विविध हस्तकलेचं सामान बनविलं! निसर्गातील पानं,फुल,पालापाचोळा,वाळलेल्या काड्या यांपासुन "गवा" या प्राण्याचे कोलाज तयार केले तर गटाच्या शिक्षक प्रमुखांनी "वनपिंगळा" हा पक्षी तयार केला! संध्याकाळी फिल्म शो बघीतला, दिवस अतिशय आनंदात गेला...
       पाचव्या दिवशी २२ तारखेला सकाळी ७ वाजता जंगलातील आवारात जमलो आज आम्हाला जंगलानजीकच्या 'मोहर्ली' या खेडेगावात जाऊन "लाकुड नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर" या विषयावर माहीती मिळवायची होती..तिथल्या स्थानिक रहिवास्यांशी संवाद साधुन तिथल्या अडचणी जाणुन घेतल्या..तिथल्या छोट्या मुलांशी गप्पा मारुन खुप छान वाटलं! दुपारी मुर्तिकाम केल त्यामध्ये विविध आकारांच्या मुर्ति बनविल्या! मातीच अन् आपल एक घट्ट नातं आहे ही जाणीव त्यावेळी झाली!
 सहाव्या दिवशी २३ तारखेला बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला.ज्यामध्ये मान्यवर म्हणुन चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,बरेचशे प्रमुख पाहुणे,मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते! आमच्या गटाला उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल बक्षिस मिळालं!...
      शेवटच्या दिवशी परतीच्या वेळेस सर्वांना नदी, तलावातील जलजीवनाबद्दल प्रत्यक्ष जाऊन माहीती सांगितली...पंतप्रधांनांसारख आम्हाला कुठलाही जीव घरी घेऊन जायला अनुमती नव्हती पण ताडोबातील एक आठवण म्हणुन आम्ही वाळुतील शंख,शिंपले गोळा करून आपापल्या बॅगेत भरली...त्या जंगलातुन परतीच्या वेळेस खरोखरचं पाय जड झाले होते!
       घर,शाळा,गाव सोडुन निसर्गाच्या शाळेत अनुभवलेले ते क्षण खुपच आनंदाचे, व नाविन्यपुर्ण होते! मला पहिल्यांदा तिथे गेल्यावर कळालं की जंगलात नुसत पर्यटनासाठी नाही तर निसर्ग अन् आपल नातं सुदृढ करण्यासाठी जायचं असत.निसर्ग भ्रमणाचा उद्देश हा निसर्गात फिरून निसर्गाचे महत्त्व समजावुन घेणे हा असतो.निसर्गाची भव्यता,विविधता,सौंदर्य यांची अनुभुती घेणे हा असतो...नुकताच मैञी दिन साजरा करण्यात आला...पण मला अस मनापासुन वाटतं निसर्गाव्यतिरीक्त आपला जवळचा मिञ कोणीही असु शकत नाही कधी कधी ज्या गोष्टी इतर कुठेही शिकायला मिळत नाहीत त्या गोष्टी निसर्ग आपल्याला नकळतपणे आपल्या सौंदर्याची उधळण करत शिकवतो! निसर्गाशी मैञी ही एक पर्वणीच आहे ज्याला मिळाली त्याने तिचे सोने करून घ्यायला हवेचं!
     

6 comments:

TANVIRPARVEJ MAKSUD SHAH BELKHED said...

👍👍👍👍👍👌👌👌👌👌😊😊😊☺☺☺

TANVIRPARVEJ MAKSUD SHAH BELKHED said...

👍👍👍👍👍👌👌👌👌👌😊😊😊☺☺☺

Unknown said...

काय जिवंत पणा आहे लेखणीत की,हुबेहुब ताडोबा डोळ्यापुढे दिसतो .या लेख च्या माध्यमातून तू आम्हाला अव्यक्त रुपाने निसर्ग दर्शन घडवून दिल.प्रथम अभिनंदन आणि मनपूर्वक आभार.

Unknown said...

काय जिवंत पणा आहे लेखणीत की,हुबेहुब ताडोबा डोळ्यापुढे दिसतो .या लेख च्या माध्यमातून तू आम्हाला अव्यक्त रुपाने निसर्ग दर्शन घडवून दिल.प्रथम अभिनंदन आणि मनपूर्वक आभार.

Abhimannyu Arun Kalne said...

सुरेख शब्दात मनमोहक निसर्ग वर्णन . वाचताना असे वाटते जसे निसर्गवर्णन लेखक लिहत नसून आपण स्वतः हे सगळे पाहत आहोत. निसर्गाचा भव्य पसारा शब्दांत आवरावयाचा यशस्वी प्रयत्न. असेच लिहीत राहा. शुभेच्छा.

Unknown said...

अतिशय जीवंत लेखणी..एकदम हुबेहुब तडोबा तू आमच्यासमोर साकारला.खुपच छान बेटा...