Wednesday 14 August 2019

"तिरंगात पारिजात"

                 "तिरंगात पारिजात"

         "तिरंगा" ज्याप्रमाणे  मुक्तहस्तपणे,स्वतंत्रपणे आकाशात लहरत असतो.. अगदी त्याचप्रमाणे पारिजातकाची फुले 'मनसोक्तपणे' आपला सडा अंगणभर पसरवत असतात... पारीजातकाच्या फुल झाडाविषयी आश्चर्यकारक अशी समानता अनुभवता येईल ती म्हणजे आपल्या भारत देशाच्या तिरंग्यात असलेले रंग ! कौतुक करायचं झालं तर पारिजातकाच्या फुलझाडाचचं करावं लागेल निसर्गाने पारिजातकाच्या झाडाला जन्म दिला,पालवी फोडली, वाढवलं.. मात्र पारिजातकाच्या फुलांना बहर येतो तो वर्षा ऋतूमध्ये म्हणजे जेमतेम मराठी महिन्यातील श्रावणात, तर इंग्रजी महिन्यातील ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान...स्वातंञ्य दिन (१५ ऑगस्ट) याच वर्षा ऋतूमध्ये येतो...तिरंग्यात असलेली तीनही रंग पारिजातकाच्या फुल झाडांमध्ये आढळतात फुलांच्या देठाचा "केशरी" रंग हा 'त्याग अन् शौर्याचे' प्रतिक तर "पांढरा" रंग हा पाकळ्यांचा असतो म्हणजे 'शांतीचे' प्रतीक आणि "हिरवा" रंग असतो पानांचा जो इतरही सर्व झाडांमध्ये पहायला मिळतो..हिरव्या रंगाचे महत्त्व म्हणजे 'समृद्धीकडे' वाटचाल म्हणजेच श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरलेलीे असते संपूर्ण 'धारा'...हिरवा शालू पांघरलेलीे असते! निश्चितच समृद्धी घेऊन येणारा महिना म्हणजे श्रावण, वर्षा ऋतू ! तुम्ही म्हणाल "निळा" रंग कुठे आहे? निश्चितच आहे! निसर्गातील विशाल, अनंत आभाळाचा... प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांना तो सुचवत असतो २४ तास प्रगतीकडे वाटचाल करावी...न थांबता, न थकता कशाचीही भीती न बाळगता!
        असा हा "तिरंगा" अन् "पारिजात" वैशिष्ट्यपूर्णतेने अन् परिपूर्णतेने भरलेला... पारिजातक फुलझाडांरुपी आपणही या "झाडातील झेंड्याला" तिरंग्याला अन् "निसर्गाला" वंदन करून स्वातंञ्य दिन साजरा करूया ! 
     स्वातंञ्य दिन अन् रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने हा दिवस पारिजातकाच्या फुलांरुपी शोभुन उठला आहे! देशाची अन् पर्यावरणाची रक्षा करणे ही दृढ संकल्पना मनात निर्माण करण्याचा आजचा दिवस!              सर्वांना स्वातंञ्य दिनाच्या अन् रक्षाबंधनच्या  नाजुक,कोमल,सोज्वळ, सुंदर पारीजातकमय शुभेच्छा!