Thursday 14 November 2019

"मोगरा जगला"...बालकदिन विशेष!

                  "मोगरा जगला"...

      मोगरा फुलला अस बऱ्याच जणांनी ऐकलेलं किंवा वाचलेलं असेल.पण मोगरा जगला हे ऐकुन थोडस विचिञच वाटेल..अन् आपसुकच मोगरा जगला म्हणजे नेमका कसा? ही काय भानगड आहे? हा प्रश्न उपस्थित होईल...आज *बालकदिन* त्यामुळे माझ्या बालपणी मी अनुभवलेल्या गोष्टी अन् निसर्ग याची सांगड घातली आहे..."मोगरा जगला"...कसा जगला?खरं तर त्यामागची कथा अन् कहाणी पण तशीच रोचक अन रोमांचक आहे...
       मि लहान असताना माझ्या घरासमोर ऐसपैस अंगण अन् अंगणासमोर गोठा असायचा...आताही डोळे बंद केले अन भुतकाळात अलगद प्रवेश केला तर अख्खच्या अख्ख अंगण अगदी हुबेहुब जसच्या तस डोळ्यासमोर येतं...अंगणात बरीचशी फुलझाडे अन् एखाद दोन फळझाडे होती...कोणी जर प्रश्न केला की फुलांचा राजा कोण? तर निश्चितच बरीचशी मंडळी गुलाब असच उत्तर देतील..अन् आहेच फुलांचा राजा गुलाब...पण मला जर वैयक्तिक प्रश्न विचारला की फुलांची राणी  कोण? तर माझ उत्तर फक्त "पारिजातक" हेच असेल...कारण गुलाब हा १२ ही महीने फुलतो..दिसतो..पण राणी (पारीजातक) माञ दुर्मिळचं फक्त श्रावणात आपल्या फुलांचा पदर अंगणभर पसरवणारी ती एकटीच, कोमल,नाजुक...प्रत्येकाची याबाबतीत विचारशैली वेगवेगळी असु शकते...मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मि पारीजातकाला "राणी" म्हणुन संबोधलं एवढचं...आता तुम्ही म्हणाल मोगरा सोडुन ही पारिजातक का सांगत आहे?...कारण आपल्याला आवडलेल्या गोष्टींचा उल्लेख आपण न राहवुन कुठेही अन् तो मग कशाही पद्धतीने का होइना आपसुकच होत असतो!...
      अंगणातील फुलझाडांमध्ये एकीकडुन पारीजातकाचं अतिशय टुमदार, गोलगोमटं, उंचावरून फुलांचा सडा संपुर्ण अंगणात पसरवुन अंगण सुगंधीत करायचा,तर दुसरीकडुन गुलाब... त्यातही निरनिराळे प्रकार 'गुलाबी गावरान गुलाब',फिकट,गर्द लाल गुलाब, पांढरा गुलाब आपल्या सौंदर्याची उधळण करत असायचा,त्यात भर घातली जायची ती जास्वंदाच्या सौंदर्याने,रूई, अन् सदाफुली...तर अत्यंत प्रिय पिवळं सौंदर्य त्यामध्ये झेंडुची टपोरी तर शेवंतीची नाजुक नाजुक फुले असायची अन् फळझाडांमध्ये आंब्याची छोटी रोपे, तर कन्हेराचं झाड मध्यम आकाराचं असायचं पण त्याला फळं यायची...अन् लहान लहान कुंड्यांमध्ये तुळशीची रोपे असायची...या सर्व फुलझाडांचा अन् फळझाडांचा  एकाच व्यक्तीला लळा असे...ती म्हणजे "माझी आजी"...इतर सदस्य आपापल्या कामात मग्न असायची.
      आजी शिकलेली नाहीये पण झाडे लावायला हवीत अन् ती जगवायला हवीत एवढचं तिला ज्ञान...यापेक्षा अनमोल ज्ञान दुसर कोणतं असु शकतं?...लहान मुले अन् छोटीशी रोपटे सारखीचं त्यांची योग्य देखभाल कशी करायची हे फक्त तिलाच ठाऊक...समोरच्या व्यक्तीला तिच्या बोलण्यात कठोरपणा जाणवतो तसा आम्हालाही जाणवतो पण ज्या व्यक्ती तिला अगदी जवळुन ओळखतात मग ती माणसे असोत किंवा झाडे तिच्या हातातील मायेची, प्रेमाची ऊब फक्त त्यांनाच ठाऊक..अंगणात एवढी झाडे होती.पण मोगरा माञ कधीच फुलला नव्हता.फुलला नव्हता म्हणजे तिने कधी मोगरा लावलाच नाही अंगणात...
    माझ्या बालपणी असलेल्या अंगणात अन् वर्तमानकाळातील अंगणात वेळेनुसार,परीस्थीतीनुसार खुप बदल झालाय आता मोजकीच झाडे उरलेली आहेत...वय झाल्यनंतर ज्याप्रमाणे शरीर क्षीण, होते त्याप्रमाणे पारिजातकाचं झाड अतिशय वयस्कर,जीर्ण झाल्यामुळे तोडावं लागलं...गुलाब माञ आहे त्या ठिकाणीच अन् आहे त्या स्थितीत अजुनही मनसोक्तपणे आपल्या फुलांचा वर्षाव दररोज एक दोन फुलांनी करतच असतो...सदाफुली निरंतर फुलते...तुळशीच्या  रोपांच्या संख्येमध्ये बरीचशी वाढ झालीये...
      माञ २,३ वर्षाआधी आजीने आमच्या समोरील रस्त्याच्या कडेला शेजारील घरामध्ये मोगऱ्याची कलम लावली अन् ती जगवली...त्याची छान छोटी छोटी नाजुक, सुंदर पांढरी फुले येणाऱ्या जाणाऱ्याला मोहीत करतात...आता तर त्याचा वेल खुप उंच गेलाय...उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी त्या वेलाची कटाई (छाटण) करण्यात आली होती...आजीच्या काय मनात आले कुणास ठाऊक तिने त्यातील १,२ कलमा घरी आणल्या व अंगणात आपल्याच हाताने रूजवल्या...ते छोटसं रोप ५,६ दिवस ताजतवानं, हिरवं दिसायच माञ नंतर कोमेजून जायचं.असा तिने बऱ्याचदा प्रयत्न केला मोगरा जगवायचा...पण अपयश...कारण तिला माहीती होत कुठलही रोप इतर ऋतुंपेक्षा वर्षा ऋतुत लवकर लागते अन्  जगते...त्यासाठीच तिचा सर्व खटाटोप चाललेला असायचा मीही कुतुहलाने त्या रूजवलेल्या रोपाला निरखुन पहात असे याची वाट पहात की आता तरी मोगरा जगला पाहीजे..पण प्रत्येकदा निराशाचं...वर्षा ऋतुतील २ महिने संपुन गेले होते तरी अजुनही समाधान झाल नव्हतं, शेवटी एका दिवशी आईने काही कलमा आणल्या अन् रूजवल्या माञ त्याच संगोपन करण्याचं काम आजीचचं...दररोज त्या रोपाला पाणी टाकायची, त्यातील माती उकरून स्वच्छ ठेवायची...यावेळेसही मला वाटल हे पण रोपटं असचं कोमेजुन जाइल त्यामुळे मि त्याकडे दुर्लक्षचं केल...माञ तिने प्रयत्न सोडले नाहीत...यावेळेस आश्चर्यचं वाटल १० दिवस उलटले तरी त्या रोपाला जेवढी जेमतेम पाच,सहा पाने होती ती हिरवीच दिसायची...शेवटी २० दिवस झाले तशीच परिस्थिती...मि पुन्हा उत्कटतेने त्या रोपाला निरखुन बघीतल...नाजुक स्पर्श केला...पण आजी ओरडली 'त्याला हात लावायचा नाही' असं तीने बजावुन सांगितल... नाहीतर आपलीच दृष्ट लागेल त्याला अन् कोमेजून जाईल अस म्हणायची...तिचा नित्यक्रम फक्त एवढाच की ती त्या रोपाला सकाळ संध्याकाळ थोडसं पाणी टाकायची...
     २ महिने झाले तरी त्याची पाने हिरवीचं...जणुकाही एखादं खोडकर बाळ आपल्या आईला ञास देतो,तिचा जीव अगदी मुठीत असतो त्याला सांभाळता सांभाळता...हुबेहुब तसचं काहीस हे रोपटं आम्हाला ञास देत होतं... नविन कोंब माञ अजुनही त्याला दिसत नव्हता...कधी कधी निराश होऊन आई  म्हणायची काही जगत नाही हे रोप...पण आजी ओरडली...ते अजुन थोडा वेळ घेईल...पण जगेल नक्की...काय आश्चर्य! त्यानंतर असचं एक दिवस सकाळी उठल्या उठल्या त्या रोपाला नविन छोटासा अंकुर आलेला दिसला..ज्याप्रमाणे नवजात बाळ आपल्या आईकडे पाहुन हास्य करतो अन् आईसुद्धा त्याच हास्य पाहुन आनंदीत होतेे अगदी त्याचप्रमाणे जणुकाही आमच्याकडे पाहुन तो हसत होता...आम्हालाही त्याचं हसु पाहुन नकळतपणे चेहऱ्यावर आनंदाची खळी खुलल्यासारखं वाटलं..एक नवचैतन्य होत त्या आनंदात...सरतेशेवटी सर्वांच्या तोंडी दोनच शब्द होते..."मोगरा जगला"...
 आता त्याला बरीचशी छोटी छोटी पाने आलेली आहेत...आता तो मोगरा.. किती उंचावर जाईल?, अन् किती फुलेल? किती फुले उधळेल?... हे त्याचं त्यालाच ठाऊक!... आमचं काम फक्त एवढचं त्याची एका लहान मुलाप्रमाणे काळजी घेणं, सांभाळणं अन् जगवणं...
      आज १४ नोव्हेंबर बालकदिन...लहानपणी मुलांच ज्याप्रमाणे संगोपन करायचं असतं.अगदी त्याप्रमाणेच झाडांनाही मायेची, प्रेमाची ऊब हवी असते...त्याशिवाय तेही आपल अस्तित्व तयार करत नाही...
आजच्या बालकदिनाच्या पर्वावरती...आपण आपसुकच म्हणतो 'लहानपण देगा देवा' पण आताच्या मुलांच लहानपण हे कुठेतरी हरवत चाललंय..त्यांना मोबाइलवरचे खेळ जास्त प्रिय वाटतात,निसर्गातील कुतुहल जाणण्यात त्यांना रस वाटत नाही...आज या लेखाच्या अनुशंगाने मला माझ बालपण आठवलं...ज्यांच ज्यांच बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेलेल असेल त्यांनाच त्यातली धन्यता कळेलं अन् निसर्ग आपला सर्वांत जवळचा सखा आहे असचं वाटेलं...बालकदिनाच्या निसर्गमयी शुभकामना!
       

2 comments:

Unknown said...

So nice
Khrc lahanpn athvl. .... Miss those days n also u my dear...

Unknown said...

अप्रतिम... लेखन कौशल्य अवगत केलं अभिनंदन मनपुर्वक तुझ आणि शुभेच्छा पुढील वाटचालीस..